नागरी सत्कार सोहळ्यात उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- डावोसला गेल्यानंतर मी लक्ष्मी मित्तल यांना भेटलो. मी त्यांना त्यांचा प्रकल्प कोकणात आणण्याची विनंती केली. तेव्हा ते माझ्याकडे पाहत राहिले, म्हणाले रत्नागिरी सोडून कुठेही सांग, मी प्रकल्प देतो, कोकणात पिठाची चक्की घालायची झाली, तरीही विरोध होतो. प्रकल्पांचे समर्थन करण्याची मानसिकता कोकणात निर्माण करायला हवी. प्रकल्पात दोष असतील, तर दूर करता येतील. परंतु योग्य प्रकल्प असेल, रोजगार देणारा असेल, कोकणचे नैसर्गिक वातावरण टिकविणारा असेल, तर अशा प्रकल्पांचे स्वागत व्हायला हवे. आपण सर्वांनी माझ्या नागरी सत्काराच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या प्रकल्पांबाबतची मानसिकता बदलण्याचा संकल्प करु, असे प्रतिपादन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
बारसूसारख्या प्रकल्पांचे समर्थन करताना ते केवळ सोशल मीडियावर करु नका, विरोधक रस्त्यावर उतरतात व समर्थक सोशल मीडियावर समर्थन करतात, यापेक्षा समर्थकांनीही रस्त्यावर उतरुन आपली भूमिका मांडायला हवी, असेही ना. सामंत म्हणाले.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषदेत उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा नागरी सत्कार ज्येष्ठ उद्योजक दीपकशेठ गद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले. परकीय गुंतवणुकीत उद्योगामध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगत ना. सामंत यांचे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. जिल्ह्याला पहिल्यांदा उद्योग खाते मिळाले व त्यातून खूप काही जिल्ह्याला मिळाल्याचे ते म्हणाले. रत्नागिरीत मरिन पार्क, मँगो पार्क होत आहे, स्कील डेव्हलपमेंट प्रकल्प झाला. बंद असलेल्या भारती शिपयार्ड सुरु होण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, स्टीलचा कारखाना होत आहे, लोटे येथे नव्याने दोन प्रकल्प ते आणत आहेत. ग्रीन व ब्राऊन बेल्टसाठी चाळीस हजार एकर जागा त्यांनी उपलब्ध करुन दिली. 2000 चा मैत्री कायदा अंमलात आणण्याचा कौतुकास्पद निर्णय त्यांनी घेतल्याचे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा डी प्लस वर्गात गेल्याने उद्योजकांना सवलती मिळणार आहेत. फेडरेशनसाठी जागा उपलब्ध होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. देवगडचे कवी प्रमोद जोशी यांनी ना. सामंत यांच्यावर लिहिलेली कविताही त्यांनी सादर केली. विजेचे दर कमी व्हावेत, काजू बोर्ड सक्षम व्हावे, सागरी व ग्रीन एक्स्प्रेस महामार्ग पूर्ण व्हावेत, लॉजिस्टिक पार्कसाठीचा खर्च कमी व्हावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
या वेळी माजी आमदार हुस्नबानू खलिपे, उद्योजक दीपक गद्रे, राजू जोशी, राजू सावंत, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, संतोष तावडे, अण्णा सामंत, डॉ. निमकर, मरिनर भाटकर, राजू सावंत, केशव भट आदी उपस्थित होते.
ललित गांधी यांनी ना. सामंत यांच्या कामाचे कौतुक केले. देशात नितीन गडकरी यांचे नाव कार्यपध्दतीमुळे समोर येते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कार्यशैलीमुळे ना. सामंत यांचे नाव समोर येते असे त्यांनी सांगितले. वेगवान निर्णय.. गतिमान सरकार याप्रमाणे सरकार खरोखरच काम करीत आहे. वेदांता गेल्याची बोंब झाली, पण जे मिळाले त्याची चर्चा होत नाही. ना. सामंत यांनी राज्यातील कारखाने सक्षम करण्याचे काम केल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. राज्यातील उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी ते करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम घेऊन गेले, तर ते कधीही निराश होऊन पाठवत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ उद्योजक दीपकशेठ गद्रे यांनीही ना. सामंत यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समृध्दी महामार्गाने महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला, त्याप्रमाणे सागरी महामार्गामुळे.. अशा शब्दात डॉ. निरगुडकर यांनी शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्राला एक चांगला उद्योगमंत्री मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या उद्योगाप्रमाणे लघु व मध्यम उद्योगांची आवश्यकता असते, असेही त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले, सीए श्रीमती ओसवाल यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजक, अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद मध्ये एमआयडीसी रत्नागिरी येथे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने उद्योजक दीपक गद्रे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. सोबत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, माजी आमदार हुस्नाबानू खलीपे, दैनिक सागरचे संचालक राजू जोशी, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.