कोकणातून वाशी मार्केटला जाणाऱ्या हापुसची संख्या घटली

पहिला बहर संपला; दुसऱ्या टप्प्यातील उत्पादनावर लक्ष

रत्नागिरी:- वातावरणातील बदलांमुळे यंदा हापूसचे मोठे नुकसान झाले असून पहिल्या बहर संपला आहे. त्यामुळे कोकणातून वाशी, पुणेसह विविध बाजार समितीत विक्रीसाठी जाणार्‍या हापूसच्या पेट्यांची संख्या घटली आहे. बाजारात साधारणतः 15 एप्रिलनंतर हापूसची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे. उत्पादन कमी असल्याने हापूसचा पाच डझनच्या पेटीचा दर दोन हजारपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

प्रारंभीच्या काळात अवकाळी पावसामुळे आलेला मोहर आणि लागलेली फळही गळून गेली. फळ धारणा कमी असल्याने बाजारातील आवक घटली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झाडावर केवळ 25 ते 30 टक्केच फळे टिकली आहेत. त्यामुळे बाजारातही आवकही कमीच होत आहे. झाडांना लागलेला मोहर गळू नये, यासाठी शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेतली. ज्या शेतकर्‍यांनी काळजी घेतली नाही, त्यांच्या बागेतील उत्पादनावर परिणाम झाला. ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रभाव अधिक होता. उत्पन्नापेक्षा मजुरी आणि औषधांचा खर्च वाढला आहे. झाडावर आणि फळावर पडणार्‍या वेगवेगळ्या रोगाचे प्रमाण वाढल्याने 10 ते 12 वेळा फवारणी करावी लागत आहे. औषधांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. त्यामुळे हंगामातील उत्पन्न कमी मिळणार आहे. मागील आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होता. त्यावरही फवारणीचा हात मारावा लागला.
वाशी बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार पेटी जात होती. त्यात रत्नागिरीतील तिस टक्के पेट्या होत्या. पुढील टप्प्यात त्यात वाढ झाली आणि दररोज 25 ते 30 हजारापर्यंत पेटी जाऊ लागली. त्यात चाळीस टक्के पेटी रत्नागिरी जिल्ह्यातील होती. मागील आठवड्यात वाशीत जाणार्‍या पेट्यांमध्ये घट झाली आहे. सध्या 21 हजाराच्या दरम्यान पेटी जात आहे. त्यात रत्नागिरीचा टक्का अधिक आहे. पहिला बहर संपत आला असून मुंबलक आंब्यासाठी ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. हापूसची बाजारातील आवक वाढल्यानंतर दर कमी होतील. तोपर्यंत दर जास्तच राहतील असे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले.