रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत खासदार मनोज कोटक यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. मुलंड येथील सेवालय या कार्यालयात भेट घेऊन विविध मागण्या करण्यात आल्या. कोकण विकास समिती, जल फाउंडेशन कोकण विभाग, खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.
दादर आणि चिपळूण दरम्यान नवीन दैनंदिन गाडी सुरू करावी, दादर आणि सावंतवाडी दरम्यान दोन्ही दिशांना दिवसा धावणारी आणि प्रत्येक तालुक्यात थांबणारी नवीन गाडी सुरू करावी, रत्नागिरी पॅसेंजर कोरोना पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत चालवावी, सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचे काही अनारक्षित डबे दिव्यासाठी राखीव ठेवून गाडी दादरपर्यंत चालवणे; जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचूवेली एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्सप्रेस, तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस, मंगळूरू – मुंबई एक्सप्रेस आणि कोइंबतूर हिसार एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा द्यावा. दादर-चिपळूण नवीन गाडी, दादर सावंतवाडी नवीन गाडी आणि खेड येथील वाढीव थांबे हे अत्याआवश्यक विषय अग्रक्रमाने हाताळण्याची विनंती करण्यात आली. खासदार कोटक यांनी याप्रकरणी लक्ष घालून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी जयवंत दरेकर, नितीन जाधव, अक्षय म्हापदी, सतीश निकम, मंगेश महाडिक, विलास यादव, नामदेव निकम, रुपेश जाधव, सचिन म्हादलेकर, महेंद्र पास्ते, नीलेश पाटणे, प्रवीण उतेकर, विशाल देवळे, मंगेश शेलार आदी उपस्थित होते.