कोकणातील कातळ खोद चित्रांना मिळणार जागतिक वारसा स्थळांचा दर्जा

पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता 

रत्नागिरीः– कोकणातील ऐतिहासिक कातळ खोद चित्रांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लवकरच मिळणार आहे. यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्यासाठी प्रथमच कातळ खोद चित्रांची निवड करण्यात आली आहे. जागतिक स्थळांना मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटन वाढीला चालना मिळण्याबरोबर जागतिकस्तरावर रत्नागिरीला नावलौकिक मिळणार आहे.

दरवर्षी प्रत्येक देश वारसा स्थळांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव सादर करतो. यावर्षी भारतातील १८ विविध स्थळांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ स्थळांची युनेस्कोकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी निवड झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ खोद चित्रांचा समावेश आहे.

जागतिक वारसा स्थळात निवड होण्यासाठी प्रथम युनेस्कोचे नामांकन मिळावे लागते. त्यासाठी या स्थळाचे नाव युनेस्कोच्या संभाव्य यादीत असणे आवश्यक असते.त्यासाठी फाइल तयार केली जाते. त्यामध्ये वारसा स्थळाच्या जतन आणि संरक्षणाची संभाव्य योजना तयार करावी लागते.रत्नागिरी जिल्ह्यातून १७ कातळचित्रांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. राज्य शासनामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकाकडे पाठविण्यात आला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या समितीतील तज्ज्ञांमार्फत पाहणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत नामांकनाची फाइल तयार करण्यात आली असून युनेस्कोकडे सादर करण्यात येणार आहे.
 

यानंतर तज्ज्ञांचे अहवाल, युनेस्कोच्या समितीचे अभ्यास दौरे व सदस्यांचे अहवाल, इत्यादी अनेक चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर अंतिम यादीत नाव देण्याचा प्रस्ताव येतो. यासाठी कमीत कमी दीड वर्षे आणि जास्तीत जास्त कितीही वर्षे लागू शकतात. त्यानंतर युनेस्कोच्या वार्षिक बैठकीत अंतिम यादीत आलेल्या प्रस्तावावर चर्चा होते. त्यात त्या प्रस्तावाच्या बाजूने अधिक मते मिळाली, तर तो मान्य होतो आणि ते वारसास्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होते.