कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख

मुंबई, रत्नागिरीत ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन

रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा शोध व कातळशिल्पांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी जागतिक वारसा कक्ष (वर्ल्ड हेरिटेज डेस्क) मुंबई व रत्नागिरीत स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टी व पठार भागात आढळलेल्या हजारो प्राचीन कातळशिल्पांचा अभ्यास, नव्या स्थळांचा शोध, शास्त्रीय दस्तावेजीकरण करण्यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. कोकणातील उक्षी, जांभरूण (२, ता. रत्नागिरी), कशेळी, रूंढे, देवीहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे (५, ता. राजापूर) या कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळ होण्यासाठी युनेस्कोने नामांकन देऊन यादीत समावेश केला आहे. २०२६ ते २९ या कालावधीत हा विशेष प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई आणि रत्नागिरी येथे दोन स्वतंत्र शाखा कार्यरत असतील.

मुंबई शाखेकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपलब्ध साहित्याचा अभ्यास, ऐतिहासिक नकाशे व उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण, डाटाबेस निर्मिती आणि युनेस्को मार्गदर्शक तत्त्वांनुसार अभ्यासपद्धती विकसित करण्याची जबाबदारी असेल. संशोधन अहवाल, परिषद सादरीकरणे आणि धोरणात्मक दस्तावेज तयार करण्याचे कामही या शाखेमार्फत केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी मनुष्यबळ, वैज्ञानिक चाचण्या, उपकरणे, वाहतूक आणि इतर प्रशासकीय खर्च यांचा समावेश असलेला निधी मंजूर करण्यात आला आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक हे या प्रकल्पाचे नियंत्रक अधिकारी असतील.

रत्नागिरीतील कक्षाचे कार्य

डेस्कची रत्नागिरी शाखा प्रत्यक्ष क्षेत्रीय कामावर भर देणार आहे. कातळशिल्पांचे सर्वेक्षण, जीपीएस नकाशांकन, ड्रोनद्वारे छायाचित्रण, भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास तसेच स्थानिक लोकपरंपरा व माहिती संकलन या कामांचा समावेश असेल. स्थानिक समुदायांच्या सहभागातून जनजागृती व संवर्धन उपक्रम राबवले जातील.