कोकणाला वाऱ्यावर सोडणार नाही; भरपाईबाबत दोन दिवसात निर्णय: मुख्यमंत्री

रत्नागिरी:- विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ, अशी माहिती मुख्यंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिली. पंचनामे पूर्ण होताच मदती संदर्भात निर्णय घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौरा दरम्यान केले आहे. कोणत्याही निकषानुसार मदत जाहीर करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरणार आहे असे ते म्हणाले.

वादळात नुकसान झालेल्यांना मदत करणार, हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय. फोटोसेशन करायला येथे मी आलेलो नाही तर मदत करण्यासाठी आलेलो आहे. तौक्ते निसर्ग चक्रीवादळाच्या आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, मी माझ्या कोकणवासियांना दिलासा द्याला आलो आहे. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आलो नाही. आता जिल्ह्याची आढावा बैठक झाली. कोकणचे वादळात मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे दोन दिवसात होतील. निकष बदलण्याची आमची मागणी आहे. निकष बदलून कोकणवासीयांना दिलासा मिळेल.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे कोकण अशी ओळख आहे. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलेले आहे. कोकण आणि शिवसेना हे जुनं नात आहे. त्यातच मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे कोकणामध्ये मदत मिळावी अशी अपेक्षा कोकणवासियांची आहे. गेल्या वर्षभरामध्ये हे दुसरे चक्रीवादळ आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ तर यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे .मोठ्या प्रमाणात फळबागा नष्ट झालेल्या आहेत. घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भरभरून मदत करावी अशी मागणी कोकणवासीयांची आहे.