कोकणनगर येथील म्हाडाच्या जागेतील सहाण तीन दिवसात हटवण्याचे आदेश

रत्नागिरी:- गावदेवी पालखीच्या सहाणेला खूप महत्त्व आहे. पालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी सहाणेची उभारणी केली जाते. शिमगोत्सवात येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यामध्ये भक्तांच्या धार्मिक भावना असतात. कोकणनगर नजिकच्या कदमवाडी येथे म्हाडाच्या जागेत बांधण्यात आलेली देवीची सहाण अनधिकृत ठरवत तीन दिवसात हटवण्याची नोटीस म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या सहाणेवर श्री रणवीर कालिका, वाघजाई ग्रामदेवता शीळची पालखी विराजमान होते. तीच सहाण हटवण्याची नोटीस म्हाडाने बजावल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर त्याला देवस्थाननेही नोटीसीद्वारे उत्तर दिले आहे.

म्हाडाच्या नोटीसीनंतर श्री रणवीर कालिका, वाघजाई ग्रामदेवता देवस्थानच्या वतीने अध्यक्ष विजय देसाई यांच्यामार्फत ॲड.अविनाश शेट्ये यांनी म्हाडाला नोटीस बजावली आहे. सहाणेच्या परिसरातील भूखंडाला कुंपण केलेले आहे. भूखंडाचा विकास अगर विक्री करण्यापूव सहाणेचे क्षेत्र वगळणे आवश्यक आहे. येथे पूर्व परंपरेनुसार धार्मिक कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. पिढ्यान्‌‍ पिढी येथे शीळ देवस्थानची पालखी येथे श्री गावखडकर बंधू (कदम) हे मानकरी असून म्हाडाला जागा देताना त्यांनी सहाणेची जागा राखीव ठेवून संपादनाला परवानगी दिली होती. नोटीसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सहाणेची बांधकाम हटवण्याची कारवाई केल्यास देवस्थानच्या रूढी, परंपरा संपुष्टात येणार आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे जनक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण धार्मिक मुल्यांची पायमल्ली केल्यास देवस्थानच्या वतीने आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवस्थानने म्हाडाला दिला आहे.
म्हाडाने थेट पालखीची सहाण तोडण्याची नोटीस पाठविल्यामुळे भक्तांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. म्हाडाने दिलेली नोटीस मागे न घेतल्यास भक्तांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री ना.उदय सामंत यांनीही सहाणेची जागा वगळण्याची सूचना यापूवच केली होती. तरीही म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सहाण काढण्याची नोटीस पाठविण्याचे धाडस कसे केले? असा प्रश्न भक्तांनी उपस्थित केला आहे.