कोकणच्या राजाला सन बर्नचा मोठा फटका; अनेक भागात कैरी पडली पिवळी

रत्नागिरी:- फळांचा राजा कोकणचा हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. सन बर्नमुळे यंदाच्या आंबा हंगाम बागायतदारांपुढे आर्थिक कसरतीचा राहण्याची शक्यता आहे.

कोकणचा हापूस समोर सध्या संकटांची मालिका उभी आहे. उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे बागायतदारांपुढे आर्थिक संकटाची चाहुल लागली आहे. लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतर देखील या मोहरावर थ्रिप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल अशी आशा बागायतदरांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून, त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे. सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास 75 टक्के हापूस हा गळून पडत आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदारांनस यंदाचा हंगाम आर्थिक कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी बागायतदरा करीत आहेत.

बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याला फटका बसत आहे. रोगामुळे नाईलाजाने औषधांची फवारणी करावी लागते. मार्चमध्ये असलेला आंबा जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळेल. त्यानंतर आणि मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल. शेवटच्या मोहरावर अपेक्षा होत्या. मात्र, त्यावरही वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल पिक वाढत्या उष्णतेने वाया जाईल का? या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.