हापूसच्या पंधरा खेपा अमेरिकेतून परत
रत्नागिरी:- सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असताना भारतीय आंबा निर्यातदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय आंब्याच्या तब्बल १५ खेपा अमेरिकेने परत पाठवल्या किंवा नष्ट केल्या आहेत. यामागे रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमधील त्रुटी असल्याचे कारण दिले आहे. या खेपांची एकूण किंमत ४.२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेमुळे भारतीय आंब्याच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘इकोनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर भारतीय आंब्याच्या खेपा थांबवण्यात आल्या. अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, फळांमधील कीटक नष्ट करण्यासाठी आणि ती जास्त काळ ताजी राहावी यासाठी केल्या जाणाऱ्या रेडिएशन प्रक्रियेच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. ही प्रक्रिया ८ आणि ९ मे रोजी मुंबईत अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखेखाली झाली होती. या प्रक्रियेसाठी आवश्यक PPQ203 फॉर्मवर यूएसडीए अधिकाऱ्याची सही असते. मात्र, नवी मुंबईतील रेडिएशन सेंटरमध्ये काही चुका झाल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे एका निर्यातदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी या आंब्याच्या खेपा परत पाठवण्याचा किंवा नष्ट करण्याचा पर्याय दिला. परंतु, आंबा लवकर खराब होणारा असल्याने आणि परत पाठवण्याचा खर्च जास्त असल्याने निर्यातदारांनी सर्व खेपा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना ४.२८ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. निर्यातदारांच्या मते, कीटकांपेक्षा कागदपत्रांमधील गडबडी हेच या समस्येचे खरे कारण आहे. या घटनेने भारतीय आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाला असून, अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत विश्वासार्हता टिकवणे कठीण झाले आहे.
भारतीय आंब्याला अमेरिकेत मोठी मागणी आहे, परंतु अशा घटनांमुळे निर्यात प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निर्यातदारांनी रेडिएशन प्रक्रिया आणि कागदपत्रांची पडताळणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रशासनानेही याबाबत तातडीने उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. या नुकसानामुळे स्थानिक आंबा उत्पादक आणि निर्यातदारांमध्ये नाराजी पसरली आहे.