रत्नागिरी:- कोकणच्या क्रांती भूमीतून हिम्मतीने केशवसुतांनी त्याकाळी ‘तुतारी’ फुंकली तसे कोकणी जनतेने आपुलकीने ‘तुतारी एक्सप्रेस’चे जोरदार स्वागत केले होते. यात साहित्य क्षेत्रातील कोकणाचा मानबिंदू असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने देखील उत्स्फुर्त स्वागत पहिल्याच दिवशी केले.
सद्यस्थितीत कोकण भूमीतून कोकणवासीयांना बाजूला ठेवून कोकणी ‘तुतारी’ कोणीतरी कोकणाच्या बाहेरील भागात म्हणजे स्पष्टच म्हणायचे तर थेट गोव्यापर्यंत घेऊन जाण्याचे षडयंत्र रचत असल्याचे दिसत आहे. दादर ते सावंतवाडी धावणारी तुतारी म्हणजे जणू कोकणवासीयांची, मुंबईच्या कोकणी चाकरमान्यांची जीवनवाहीनी! सायंकाळी चाकरमानी ड्यूटी आटपून घरी जावून जेवून रात्री उशीरा 12 वाजता गाडीत बसला तरी सकाळी सूर्य उगवताना रत्नागिरीत पोहचतो तर न्याहरीला सावंतवाडीत असतो. तसेच शेतीची, गावातील कामे आटपून सायंकाळी 8 वाजता सावंतवाडीतून बसलेला कोकणी प्रवासी थेट सकाळचे पाणी भरून, डबा तयार करून कामावर जाण्यास तयार अशावेळी मुंबईत उतरतो . अनेक वर्षांपासून हा जीवनक्रम सुरू असताना कोकणची तुतारी आता मेंटेनन्सच्या नावाखाली थेट गोव्यात जाणार असल्याची कुणकुण लागल्याने भाबडा कोकणी भांबावून गेल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ‘कोकण रेल्वे’ हे नाव केवळ नावापुरतेच उरते की काय? अशी भिती कोकणवासीयांच्या मनात धडकी भरवत आहे. असे झाले तर कोकणात कोकण रेल्वे आहे, मात्र रेल्वेत कोकणी माणूस दिसेल की नाही? की केवळ दरवाजांवरती लटकलेला कोकणी प्रवासी पहायला मिळेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. कोकणाची जमीन लाटून आता कोकणी माणसाची प्रवासाची गैरसोय करणाऱ्या केवळ नावापुरत्या उरलेल्या कोकण रेल्वेने कोकणी माणसाचा योग्य त्या तऱ्हेने विचार न केल्यास भाबडे कोकणी वाभाडे काढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. कारण स्वप्राणाने तुतारी फुंकणाऱ्या केशवसुतांचे कोकणी प्रवासी वारसदार आहेत. तसेच देशाला पाच भारतरत्न देणारे वारसदार कोणीही विसरण्याची चूक करू नये. कोकण रेल्वेचे मधु दंडवते यांनी कोकणासाठी घेतलेल्या निर्णयाकडे कोणी जाणीवपूर्वक पाठ फिरवताना दिसेल असेल तर कोकणी माणूस नक्कीच त्यांना योग्य ती दिशा दाखवेल, असेही काही प्रवाशांकडून बोलले जात आहे.
तत्कालीन परिस्थितीत पारंपारिक एकत्रित गुंठाभर जागा देखील कोकण रेल्वेसाठी देण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कोकणी माणसाच्या नशीबी केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये फक्त दरवाजात अंग चोरून बसण्याची वेळ येणार असेल तर आता खऱ्या अर्थाने कोणाही तथाकथित मोठ्या समजणाऱ्या कोकणी पुढाऱ्यांच्या मागे न लागता कोकणी जनतेने पुन्हा एकदा केशवसुतांप्रमाणे स्वप्राणाने ‘तुतारेी फुंकण्याची गरज आहे अशी चर्चा आता घडू लागली आहे. सावंतवाडी टर्मिनस 30 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून देखील राजकारणी टर्मिनसकडे पलटूनदेखील पाहत नसतील तर कोकणी जनतेने आता स्वतःच रस्त्यावर नव्हे रूळावर उतरण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. केवळ मतासाठी दारोदारी हिंडणाऱ्या राजकारण्यांना देखील या माध्यमातून रूळावर यावेच लागेल, अशी भूमिका केशवसुतांच्या वारसदारांनी ‘तुतारी’ला वाचवताना नाही घेतली तरच नवल म्हणावे लागेल.









