कोकणच्या कृषी पॅटर्नची राज्यस्तरावर दखल

गुगल फॉर्मवर यंत्रणा अपडेट; एका क्लिकवर माहिती

रत्नागिरी: – कोरोना कालावधीत कृषी ची यंत्रणा प्रत्यक्ष गावात कार्यरत राहून शेतकऱ्यापर्यंत पोचते कि नाही याच थेट मॉनिटरींग उपसंचालक स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आहे. कृषि सहाय्यकाला दर आठवड्याची माहिती गुगल फॉर्मवर भरण्यास बंधनकारक केल्यामुळे योजना राबवण्याला गती मिळाली असून पाट्या टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक बसला आहे. तसेच पाचही जिल्ह्यातील माहिती एका क्लिकवर आली. कृषी उपसंचालक विकास पाटील याचा हा प्रशासकीय उपक्रम राज्यासाठी पथदर्शी ठरला आहे. याची दखल आयुक्तांनी घेतली असून  राज्यात याची अमलबजावणी करण्यासाठी प्रेझेन्टेशन करण्यास सांगितले आहे.

कृषी विभागाचे कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन रिपोर्टींग चा फंडा प्रशासकीय कामात आणला जात आहे. कृषी विभागानेही त्याच पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोंकणातील पाच जिल्ह्यात 1128 कृषी सहायक,  185 सुपरवायझर,  95 मंडळ कृषी अधिकारी असा सुमारे 2 ते 3 हजार कर्मचाऱ्याचा दररोज आढावा घेणं शक्य नाही. त्यामुळे चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अच्छे दिन होते. कृषी सहायक मंडळ अधिकाऱ्याला तर तेथून अहवाल तालुका, जिल्हा आणि शेवटी उपसंचालकांकडे जात होता. यात बराच वेळ जात होता. हा वेळ वाचवण्यासाठी आणि कामात दर्जा आणण्यासाठी नियमित आढावा घेण्याची सवय तळात काम कर्मचाऱ्यांना लावण्यात आली आहे.

कृषीच्या महत्वाच्या योजनाच रिपोर्टींग ऑनलाईन करण्यात आलं आहे. यात फळ लागवड किती झाली, खड्डे किती मारले, किती शेतीशाळा घेतल्या, किती शेतकरी सहभागी झाले याची सविस्तर माहिती फोटो सह गुगल फॉर्म वर भरली जात आहे. ती एक्सलशीटवर एकत्रित होते. त्यातून मॉनिटरिंग करणं शक्य झालं असून कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जात आहे. त्याचे फोटो ही अपलोड होत आहेत. टंगळमंगळ करणाऱ्या कृषी सहाय्यकांवर अंकुश आला आहे. खरीप हंगामात पिक निहाय लागवड किती आहे, त्याची माहिती संकलित करता आली. पेरणी पासून कापणी पर्यंत भाताच्या 9 शेतीशाळा घेणे आवशक्य आहे. त्याची माहिती थेट वरिष्ठाना मिळत आहे. त्यातून कामाचा दर्जा सुधारला असून शेती शाळा कागदावर घेणाऱ्यांवर चाप बसला आहे. भात क्षेत्राची पिक पेरणी किती झाली, ही माहिती नजर अंदाजाने कर्मचारी पाठवत होते. कोंकणातही सरासरी क्षेत्र सांगितले जाते. मात्र ऑनलाईन रिपोर्टींग मुळे प्रत्यक्षात किती लागवड झाली याची माहिती मिळाली आहे.

आतापर्यंत उच्चतम बाजूने अहवाल दिला जात होता. यामुळे जिल्ह्यातील भात लागवडीचे क्षेत्र समजले असून त्यात वाढ करणे किंवा कमी जागेत लागवड करून उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने कृषी विभागाला नियोजन करणे शक्य होणार आहे. कोणत्या भागात कीड रोग आहेत,  त्यावर उपाय करणे, भात क्षेत्रातील प्रगती याची माहिती एका क्लिकवर मिळत आहे.