रत्नागिरी:- भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, पणन मंडळ, अपेडा आणि सानप अॅग्रोअॅनिमल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांनी फळांचा राजा आंबा प्रथमच समुद्रमार्गे मुंबईतून अमेरिकेत रवाना झाला. 5 हजार 520 बॉक्सेसमधून 16 हजार 560 किलो आंबा कंटेनरद्वारे जात आहेत. त्यामुळे वाहतुक खर्च 10 टक्क्यांवर येणार असून अमेरीकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरणार आहे.
मुंबईत या कार्यक्रमावेळी भाभा अॅटोमिकमधील बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, अमेरीकेचे क्वारंटाईन निरीक्षक डॉ. कॅथरीन फिडलर, एनपीपीओचे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, अपेडाचे उपसरव्यवस्थापक रविंद्र सानप, अॅग्रोअॅनिमल्सचे शिवाजीराव सानप, पणनचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते. कृषिमालाची निर्यात आणि कृषिमालाची साठवणुक क्षमता वाढविण्यासाठी भाभा अॅटोमिक सेंटर सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन डॉ. घंटी यांनी दिले.
समुद्रमार्गामुळे आंबा सुमारे दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी अमेरिकेतील बाजारपेठेत राहणार आहे.
भारतातून 2019 मध्ये अमेरीकेस सुमारे 1200 मेट्रीक टन आंबा निर्यात केला होता. पुढे दोन वर्षे कोरोना मुळे निर्यात होऊ शकली नाही. अमेरीकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या 100 टक्के हवाईमार्गे होते. त्यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे 550 रुपये विमानभाडे द्यावे लागते. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा येत आहेत. कोरोना मुळे दोन वर्षे निर्यात बंद हेाती. यंदाच्या हंगामात कंटेनर थेट अमेरीकेत पाठविण्याचे नियोजन 30 मे पासून सुरु झाले होते. या कंटेनरसाठी 29 मे ते 2 जुन 2022 असे पाच दिवस आंबा नोंदणीकृत बागांमधून तोडणी करुन नवी मुंबईतील वाशी पणन केंद्रात आणण्यात आले. निर्यातीसाठीचा 5 हजार 520 बॉक्सेसमधील 16,560 किलो आंबा कोल्डस्टोरेज मध्ये साठविण्यात आला होता. ते कंटेनर 3 जुन रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदराकडे रवाना झाले. रविवारी (ता. 5) ते कंटेनर अमेरीकेकडे रवाना झाले. ते कंटेनर अमेरीकेत नेवार्क या न्युजर्सी शहराजवळील बंदरात पोहोचतील.









