पाऊस, ढगाळ वातावरणाने तुडतुडा, फुलकीडा पडण्याची भीती
रत्नागिरी:- अवकाळी पाऊस, बोचरी थंडी आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण या विचित्र वातावरणाला गेल्या आठ दिवसांमध्ये आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा, फुलकिडा यासारख्या हापूसवरील रोगांना निमंत्रणच ठरले आहे. औषध फवारणीचा हात वाढला असून त्यावरील खर्चात भर पडली आहे.
उत्तरेकडील थंड वार्यांमुळे कोकणात तापमानाचा पारा घसरु लागला होता. हापूसला पोषक थंडीही पडू लागली. मात्र अचानक रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. उशिराच्या टप्प्यात आलेला मोहोरामध्ये पावसाचे पाणी साचुन बुरशीजन्य रोगांची भिती बागायतदारांवर होती. त्यापासून वाचण्यासाठी बागायतदारांना बुरशीनाशकांच्या फवारणीचा पर्याय अवलंबावा लागला. सुरवातीच्या टप्प्याती दोन ते तीन फवारण्या करणारा बागातदार अवकाळीपासून संरक्षण व्हावे म्हणून चार ते पाच फवारण्या करताये. अवकाळी पावसानंतर लगेचच कडाक्याची थंडी पडली दापोली, खेडमध्ये पारा 9 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. जिल्ह्यात सगळीकडेच दिवसाचा पाराही घटलेला होता. थंडीमुळे अनेक बागांमध्ये जुन्या मोहोराला पुन्हा मोहोर आला आहे. त्यामुळे जुना मोहोर आणि त्याला आलेली कैरी गळून जात आहे. आधीच बदलत्या हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनाला बसणार आहे. आधीच अवकाळीमुळे फवारणीचा खर्चात वाढ झाली असून मोहोर खुडून टाकण्यासाठी मजुरीवर खर्च करावा लागत आहे. एका फांदीला चार मोहोर आल्यामुळे गळ वाढणार आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर हळूहळू सुर्यकिरणे पडू लागली. ढगाळ वातावरणामुळे मोहोरासह कैरीवर तुडतुडयाचा अॅटॅक होणार आहे. काही ठिकाणी फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे फळावर काळे डाग पडले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळही झालेली आहे.
ढगाळ वातावरण हापूसवरील रोगराईला निमंत्रण आहे. त्यापासून वाचण्यासाठी फवारणीचा हात द्यावा लागले. थंडीनंतर पुढे तापमान वाढले तर फळगळीचा त्रास होऊ शकतो.
– डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार