कोंडगाव येथे कंटेनर- एसटीचा अपघात; कंटेनर चालकावर गुन्हा

संगमेश्वर:- कोंडगाव तिठ्यापासून 30 मीटर अंतरावर देवरूख रोडवर 26 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसचा अपघात झाला. याप्रकरणी कंटेनर चालक तानाजी ज्ञानेश्वर बागल (रा. गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरोधात 26 जून रोजी दुपारी 2.31 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल दिनकर दळवी (वय 34, व्यवसाय चालक, खेड आगार, रा. पिंपळगाव खवडा, ता. नगर, जि. अहमदनगर, सध्या रा. खेड एसटी आगार कॉलनी, खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तानाजी बागल हा आपल्या ताब्यातील कंटेनर ( डीडी 03 पी 9420) लोटे खेड येथून देवरूख मार्गे कोल्हापूर दिशेकडे जात होता. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना एसटी बस ( एम.एच.20 बी.एल.1960) हिला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कंटेनर चालक तानाजी बागल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.