कोंडआंबेडमध्ये दरड कोसळून घराचे नुकसान

संगमेश्वर:- तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवरील गावांमध्ये नैसर्गिक संकटाचे सावट घोंगावत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोंडआंबेड गावात डोंगर उतारावरून दरड कोसळून मोठा अनर्थ टळला, मात्र स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.

या घटनेत मोहन रामचंद्र रहाटे यांच्या घराच्या पाठीमागील डोंगर उतारावरून दरड सरकली. दरडीचा जोर इतका होता की घराच्या मागील भिंतीला तडा गेला असून, घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घटना अतिशय गंभीर स्वरूपाची होती.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरडी धोकादायक ठरत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहाटे कुटुंबियांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या धास्तीखाली असून, भविष्यातील धोका लक्षात घेता तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

घटनास्थळी महसूल विभाग व ग्रामपंचायतीने तात्काळ भेट देऊन पंचनामा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत आणि सुरक्षित निवास व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.