कॉजवेवरून चालताना नदीत पडून वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- काजळी नदीवरील कॉजवेवरून चालत जात असताना पाण्यात पडून एका ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ जून रोजी देवरुखजवळील देवपट्टा येथे घडली. दीपक अंकुश गोरुले (वय ३९, रा. तिवरे तर्फे देवळे, ता. संगमेश्वर) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोरुले हा २४ जून रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.१४ या वेळेत महावितरण सबस्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या देवपट्टा येथील काजळी नदीवरील सिमेंटच्या पुलाजवळच्या कॉजवेवरून चालत होता. त्याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो कॉजवेवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहून गेला.

स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू असताना दीपक गोरुले मृतावस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तिवरे तर्फे देवळे परिसरात शोककळा पसरली आहे.