रत्नागिरी:- तालुक्यातील केळ्ये मजगाव येथील नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. शुभांगी सुरेश मांडवकर (वय ५०, सध्या रा. केळे ठिकवाडी, पूर्वीचे नाव कलावंती गजानन कुर्ते) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, केळये मजगावचे पोलीस पाटील हे सकाळी फिरण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांनी त्यांना मजगाव शितपवाडी येथे नदीच्या पात्रात एक महिला तरंगत असल्याची माहिती दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, गोडबोले कोड येथे नदीच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तोंड खाली केलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस पाटलांनी महिलेची ओळख शुभांगी सुरेश मांडवकर म्हणून पटवली. कोणतीही हालचाल दिसत नसल्याने पोलिसांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.