भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी
रत्नागिरी:- कोरोनानंतरच्या संकटावर मात करत केंद्राच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ झालेली नाही. या अर्थसंकल्पामुळे कोकणातील अपुर्ण मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेचा विस्तार, विद्युतीकरण पूर्ण होईल, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, राजेश सावंत, सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. भारतालाही त्याचा सामना करावा लागला या परिस्थितीत , आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी , नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ केली नाही. महागाई दर देखील 5 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यश आले आहे. रस्ते, वीज , पाणी , रेल्वे , मेट्रो , माल वाहतूक मार्गिका , बंदरे , विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र 7 लाख 54 हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सरकारने कार्यक्रम हाती घेतले असून किमान हमीभाव, दुग्धव्यवसाय- मधुमक्षिका पालनासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीसाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे अपुरे राहीलेले काम पूर्णत्वास जाईल. 2023 पर्यंत सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण 100 टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आणि आधुनिकरणाला गती मिळणार आहे. येत्या वर्षभरात कोकणातील हाती घेतलेले प्रकल्प यामधून पूर्णत्वास जातील.