कृषी योजना शेतकऱ्यांसाठी ठरतायत वरदान 

रत्नागिरी:- कृषी यांत्रिकीकरण फलोत्पादनाशी निगडीत विविध योजनांचा समावेश असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतात. दिवसेंदिवस मजुरांचा प्रश्न गंभीर होत असल्याने यंत्राच्या सहाय्याने शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. त्यामुळे ट्रक्टर, पॉवरटिलर इ. यंत्र खरेदीवर सर्वसाधारणपणे 40 टक्के ते 50 टक्के पर्यंत अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. या योजना शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहेत.
शेतकर्‍याने या सर्व योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक असून सदर शेतकरी स्वतः किंवा आपले सरकार केंद्रामार्फत अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर निवड झाल्यानंतर शेतकर्‍यांना तसा संदेश येतो. त्यानंतर त्यांनी कागदपत्र पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्र सादर केल्यानंतर पूर्वसंमती देण्यात येते. पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकर्‍यांनी यंत्र खरेदी केल्यानंतर क्षेत्रीय स्तरावर मोका तपासणी करून त्यासंबंधीचे कागदपत्र पोर्टलवर सादर केल्यानंतर अनुदान थेट शेतकर्‍यांच्या  खात्यावर वर्ग करण्यात येते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका, क्षेत्र विस्तार यामध्ये हळद, मिरची यासारखी मसाला पिके, पुष्पोत्पादन, अळींबी उत्पादन, सामूहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चींग यासारखी नियंत्रित शेती, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मधुमक्षिकापालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण यामध्ये ट्रॅक्टर, पॉवरटिलर, पिक संरक्षण उपकरणे तसेच मनुष्यबळ विकास कार्यक्रम-शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण काढणीत्तोर व्यवस्थापनांतर्गत पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, उत्पादन मान विक्रीसाठी फिरते विक्री केंद्र अशा विविध बाबींचा समावेश असून जिल्हयासाठी एकुण रक्कम रूपये 229.22 लाखाचा कार्यक्रम मंजूर आहे.
या व्यतिरिक्त विविध पिकांपासून मिळणार्‍या उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजना कार्यान्वित आहे. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक संघ, संस्था किंवा स्वयंसहाय्यता गट/सहकारी उत्पादक यांना नवीन अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अथवा अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाच्या विस्तारीकरण्यासाठी स्तरवृध्दीसाठी अथवा आधुनिकीकरणासाठी बँक कर्जाशी निगडीत 35 टक्के किंवा जास्तीतजास्त रक्कम रुपये 10.00 लाखापर्यंत अनुदान देय आहे.

बँडींग मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाला खेळते भांडवल व छोटया आजारांची खरेदीसाठी भांडवल म्हणून रुपये 40,000 प्रति सभासद याप्रमाणे 10 सदस्यांना रूपये 4.00 लाखापर्यंत बीजभांडवल देय राहील. या योजनेच्या अधिक माहितीसाठी वैयक्तिक अथवा गट लाभार्थींसाठी संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

या योजनांप्रमाणे प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी देखील बहुधारक शेतकर्‍यांना 45 टक्के अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना 55 टक्के अनुदान प्रवर्गनिहाय देण्यात येते व याला पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजनेमधुन अनुक्रमे 75 टक्के व 80 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ इच्छुक शेतकर्‍यांनी घ्यावा. सर्व प्रवर्गातील शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत सहभागी होऊन विविध योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.