रत्नागिरी:- प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षीपासून सुरु केलेल्या कृषी पायाभूत निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील ६ शेतकर्यांनी घेतला आहे. या अंतर्गत आंब्यासाठी रायपनिंग चेंबर आणि पाच जणांनी काजू प्रक्रियेसाठी कर्ज घेतले आहे. लाभार्थ्यांना तीन टक्के व्याज परतावा शेतकर्यांना मिळणार आहे.
केंद्र शासनाकडून कृषी पायाभूत निधी योजना जुलै २०२० पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. याचा लाभ घेणार्यांपैकी रत्नागिरीतील आंबा उत्पादक देवेंद्र झापडेकर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत योजनेच्या लाभाबाबत विचार जाणून घेतले. या योजनेंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी आणि सामुहिक शेतीकरीता आवश्यक किफायतशी प्रकल्पासाठी शासनाकडून पाठबळ देण्यात आले आहे. श्री. झापडेकर यांनी आंबा पिकवणी केंद्रासाठी बँक ऑफ इंडियाकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले. गतवर्षी त्यांनी दर्जेदार आंबा बाजारात विक्री केला. तसेच त्यांना नैसर्गिंकरित्या आंबा पिकवणेही शक्य झाले. झापडेकर यांच्याबरोबर जिल्ह्यातून कृषी पायाभूत सुविधांसाठी नऊ जणांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील एकाचा प्रस्ताव अटी-शर्थींमध्ये न बसल्यामुळे रद्द करण्यात आला. उर्वरित आठ पैकी सहा जणांना कर्ज मंजूर झाले असून दोघांचे प्रस्ताव दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. सर्वांना मिळून ३६ लाख १६ हजाराचे कर्ज मंजूर झाले आहे. त्या लाभार्थ्यांना तीन टक्के व्याज परताव्याचा लाभ मिळेल. हे कर्ज विनातारण दिले जात असून अनुदानाच्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ संबंधित शेतकरी घेता येऊ शकतो.