कृषीच्या बारा घटकांचा ताळेबंद एका क्लिकवर 

रत्नागिरी:- तळागाळात काम करणाऱ्या कृषी सहायकांनी केलेल्या कामाची माहिती तत्काळ आणि सोप्या पद्धतीने थेट संचालकांपर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या ऑनलाईन रिपोर्टमध्ये बारा विविध घटकांचा समावेश आहे. बांधावर खते, बियाणे वाटपापासून ते फळबाग लागवडीसह रानभाज्या महोत्सवाची माहिती गुगल फॉर्मवर उपलब्ध आहे.

ही संकल्पना कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी राबवली आहे. कोरोना कालावधीत त्याचा फायदा झाला. कामात सुसूत्रता आली. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी झाली तरी योग्य वेळेत रिपोर्टिंग न झाल्याने अडचणीच्या ठिकाणी काम करता येत नाही. त्या त्रुटी वेळेत सोडविण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन नोंदणीचा फंडा राबविण्यात आला. यामध्ये विविध योजनांचे सनियंत्रण व प्रगतीचा आढावा दर आठवड्याला, त्यात बांधावर खते-बियाणे वाटप, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड, फळबाग लागवडीकरता इच्छुक शेतकऱ्यांची संमती, खासगी व शासकीय विद्यापीठ रोपवाटिकामधील कलमे रोपे उपलब्धता, शेती शाळा, मृग पंधरवडा अंतर्गत कार्यक्रम नियोजन व अंमलबजावणी, कृषी संजीवनी सप्ताह नियोजन व अंमलबजावणी, क्षेत्रीय भेट पंधरवडा कार्यक्रम नियोजन व अंमलबजावणी, खरीप हंगामातील पीक पेरणी अहवाल आदींचा समावेश आहे.

कोरोनाच्या कालावधीत वरिष्ठांना गावपातळीवर जाणे शक्‍य नव्हते. कृषी सहाय्यकांचे दर आठवड्याला केलेल्या कामाचा फीडबॅकसाठी फायदा झाला. खते, बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोचवली जातात का, याची माहिती थेट संचालकांपर्यंत फोटोसह पोचत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांविरोधात होणाऱ्या तक्रारींना चोख उत्तर देणे कृषी विभागाला शक्‍य झाले. लक्षांक किती पूर्ण होत आहे, त्याचा आढावा घेणे सोपे गेले. किती खड्डे खोदले गेले, रोपांची उपलब्धता किती, नसल्यास पर्यायी व्यवस्था यावर उपाय करता आले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, अडीअडचणी वरिष्ठांपर्यंत पोचवणेही सोपे झाले. 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिकेल ते विकेल कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपातळीवर करता आले. त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकरी सहभागी झाला.” – विकास पाटील, कृषी सहसंचालक, कोकण विभाग