60 व्या वाढदिनानिमित्त सावरकर नाट्यगृहात 23 जुलै रोजी सोहळा
रत्नागिरी:- समाजकारणासह राजकारणात काम करत असताना अनेकांनी पाठबळ आणि आर्शिवाद दिले. त्यामुळेच दोन मोठ्या अपघातांसह ब्रेन हॅमरेजसारख्या आजारपणातून लिलया बाहेर पडलो आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने २३ जुलैला स्वा. सावरकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी मार्गदर्शक माजी खासदार अनंत गिते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना श्री. बने यांनी मागील साठ वर्षातील जीवनात घडलेल्या घडामोडींची माहिती दिली; मात्र त्यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले नाही. ते म्हणाले, राजकीय जीवनापलिकडे वैयक्तिक आयुष्य असते. विविध राजकीय पक्षातील लोक माझे मित्र आहेत. २३ जुलै १९६२ साली दापोलीत जन्म झाला. वडील पोलिस खात्यात असल्यामुळे नोकरीनिमित्त विविध ठिकाणी जावे लागत होते. प्रतिकुल परिस्थितीमधून मार्ग काढत शालेय शिक्षण पुर्ण झाले. त्यानंतर वेळप्रसंगी गॅरेजमध्येही काम केले. एका खासगी कंपनीत नोकरी केली. ते करत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आवडल्यामुळे शिवसेनेचे काम करण्यास आरंभ केला. शिवसेनेची पहिली शाखा सुरु करण्यावेळी माझी मुख्य भुमिका होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा त्यांचा वसा आम्ही आजही चालवला आहे. माजी खासदार अनंत गितेंेचे मार्गदर्शन जीवनात उपयुक्त ठरले. १९९५ आणि २००१ साली दोन मोठे अपघात झाले. त्यानंतर २०१८ साली ब्रेनहॅमरेज झाला. यामधून सहीसलामत बाहेर पडलो. जीवनाच्या या प्रवासामध्ये ज्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांची कृतज्ञता मानण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही, त्यामुळे आठवणींवर बोलण्याचे आवाहन कार्यक्रमात करणार आहे, असे त्यांनी सांगितले.









