कुवे संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा

लांजा:- कचरा डेपो पंधरा दिवसात असे स्थलांतरित करतो, मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही कचरा न उचलल्याने कुवे ग्रामस्थांनी या विरोधात येत्या १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांना सादर केले.

निवेदनात म्हटले आहे, कुवे संघर्ष समितीच्यावतीने लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना २७ जून रोजी निवेदन सादर केले होते. कुवे येथील शासकीय जागेत गेल्या दोन वर्षांपासून टाकण्यात येणारा कचरा लोकांना त्रासदायक ठरत आहे.

त्यामुळे हा कचरा डेपो तातडीने स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने प्रशासनाला करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन मुख्याधिकारी बाबर यांनी १४ जुलै रोजी संघर्ष समितीला पत्र देऊन पुढील १५ दिवसात कचरा डेपो स्थलांतरित केला जाईल असे सांगितले होते. मात्र अद्यापही कचरा डेपो स्थलांतरणाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसून कचरा आजही कुवे येथे टाकण्यात येत आहे.