रत्नागिरी:- ड्युटी संपवून कसोप येथील आपल्या घरी निघालेल्या पोलीस कर्मचारी सचिन कुबल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. पावस मार्गावरील कुर्ली येथे हा अपघात झाला. गंभीर जखमी कुबल यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवत असताना त्यांचे निधन झाले.
सचिन कुबल हे पोलीस मुख्यालयात पाण्याचा टँकरवर वाहन चालक म्हणून सेवेत होते.पोलीस नाईक असलेले सचिन कुबल हे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पूर्ण करून आपल्या दुचाकीवरून कसोप येथील आपल्या घरी निघाले होते. कुर्ली फाट्या पूर्वी असलेल्या उतारावरून ते पुढे जात असताना पावसहुन रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. मात्र वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनीतकुमार चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु श्री.कुबल यांना कोणी धडक दिली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.