कुर्धेत थांबलेल्या एसटीला धडक, बस चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कुर्धे येथे प्रवासी उतरवत असलेल्या एसटीला दुसऱ्या एका एसटी बसने पाठीमागून ठोकर दिल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध पूर्णगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश रावण पाटील (३४, रा. शिरोळ जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे.

निलेश हा २७ रोजी रत्नागिरी ते अणसुरे एसटी बस (एमएच १४ बीटी २९९१) घेऊन जात होता. सायं. ६ वा. बस कुर्धे स्टॉपजवळ आली असता त्याठिकाणी दुसरी एसटी बस (एमएच १४ बीटी २२२९) प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबलेली होती. यावेळी निलेश याचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरील बसला जोराची धडक बसली. या अपघातात बसमधील चार प्रवाशांना दुखापत झाली व दोन्ही बसचे नुकसान झाले. अशी नोंद करण्यात आली आहे.

जखमी प्रवाशांमध्ये पियुषा हातकर (१९, रा. आडीवरे, राजापूर), सुनंदा जागळे (७५, रातांबशेंडास, राजापूर), पुंडलिक गोळपकर (७३, रा. नादे राजापूर) व विनायक गुरव (५२, रा. वेळवंड, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी निलेश याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.