कुरतडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी:- कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील कातळवाडी येथे रविवारी सकाळी साडेसात वाजता विहिरीत बिबट्या सापडला. वन विभागाला कळविल्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
कुरतडे परिसरात गेले सहा महिने बिबट्याचा वावर आहे. यापूर्वी मारुती शिंदे यांची गाय त्याने मारली होती. लोकवस्तीत येऊन कुत्र्यांना मारण्याचे प्रकार बरेच वेळा झाले होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रारीही दिल्या होत्या. कातळवाडीतील मंगेश पांडुरंग फुटक आज सकाळी शेताला पाणी लावण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीच्या वरची जाळी दिसली नाही. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता तेथे त्यांना बिबट्या पाइपला धरून बसल्याचे त्यांना दिसले. भक्ष्याचा पाठलाग करत असताना काल रात्री तो बिबट्या विहिरीत पडला असावा.
श्री. फुटक यांनी याबाबतची माहिती वन विभागाला तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविली. पोलिसांनीही वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार वन विभागाचे बचाव पथक सकाळी साडेआठ वाजता घटनास्थळी पोहोचले. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा बिबट्या विहिरीत पाण्याच्या पाइपला धरून बसल्याचे दिसले. श्री. फुटक यांच्या घराजवळची ही विहीर सुमारे ५० फूट खोल, तर १५ फूट व्यासाची आहे. तिला चार फूट उंचीचा कठडा आहे. विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा सोडण्यात आला आणि अवघ्या दीडच मिनिटांमध्ये बिबट्या पिंजऱ्यात शिरला. त्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. हा मादी जातीचा बिबट्या आहे.

पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत विभाग तसेच ग्रामस्थांनी साथ दिल्याने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बिबट्या वाघिणीला पाहण्यासाठी परिसरातून लोकांनी मोठी गर्दी केली होती.