कुमार शेट्ये, सुदेश मयेकर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत

राष्ट्रवादीची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक; शरद पवारांशी एकनिष्ठ

रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विस्तारित कार्यकारिणी बैठक पक्षाचे निरीक्षक बबन कनावजे व शेखर माने यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हाध्यक्ष पदासह अन्य पदांच्या नियुक्तीसाठी चर्चा झाली. तेव्हा जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रमेश कदम प्रदेश कार्यकारिणीवर गेल्याने ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि माजी नगराध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाशी प्रामाणिक आहेत.
मंडणगड, दापोली ते राजापूरपर्यंत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची विस्तारित कार्यकारिणी बैठक पक्षाचे निरीक्षक बबन कनवजे व निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीमध्ये देवरूख मराठा भवन येथे पार पडली. जमलेल्या सर्वांनी आपण राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे राहण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही फरक पडणार नाही. सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या पाठीशी ठाम आहेत. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष पदापासून ते सर्व तालुकाध्यक्ष पदापर्यंतच्या विषयावर पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली व लवकरच कार्यकारिणी जाहीर करू, असे कनावजे यांनी सांगितले.

या बैठकीला बारक्याशेठ बने, रमेश कदम (प्रदेश उपाध्यक्ष), महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बशीर मुर्तुजा, सुदेश मयेकर (माजी नगरसेवक), कुमार शेटे (माजी जिल्हाध्यक्ष), नलिनी भुवड, धनश्री मोरे, नौसिन काझी, सिद्धेश शिवलकर, राजाभाऊ लिमये, मोहम्मद रखांगी, प्रकाश शिवगण, दत्ता पवार, साहिल आरेकर, मनू गुरव, राजन सुर्वे, जुबेर काजी, मेहबूब मोगला, मुजफ्फर काझी, सौरभ लवदे, बापू जाधव, शमीक नाईक, निहाली नागवेकर, शमा थोडगे आदी उपस्थित होते.


रमेश कदम प्रदेश कार्यकारिणीवर
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते; परंतु पक्षाने त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर गेल्याने या स्पर्धेतून बाजूला झाले आहेत. कुमार शेट्ये आणि सुदेश मयेकर यांच्या नावाची चर्चा आहे.