रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार दरम्यान स्वाराचा मृत्यू झाला. निखील सदाशिव लोध (वय ४३, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना ७ ऑगस्टला सिध्दांत हॉस्पिटल कोल्हापूर येथे घडली होती. सोमवारी (ता.१३) ऑक्टोबरला या बाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल लोध हे आरोग्यमंदिर येथून दुचाकी (क्र. एमएच-०१ डी.एम.८९६७) वरुन पांडवनगर मार्गे जात असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागे कुत्रे लागले. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा सात ऑगस्टला दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.