कुटुंबाला भेटायला, गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलोय: उद्धव ठाकरे

रत्नागिरी:- कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना भेटायला आलोय. सोबत गद्दारांच्या पेकाटात लाथ मारायलाही आलोय. दहा वर्षांपूर्वी हा गद्दार लाचारी करीत माझ्याकडे आला. होय, मी मंत्रीपदाचा शब्द दिला होता. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. दिलेलं वचन मी पाळतो. सुरूवातीला म्हाडाचा अध्यक्ष केला. पुन्हा सरकार आल्यानंतर थेट मंत्री केला. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, पण अखेर याने गद्दारी केलीच. स्वतःचे उद्योग जोरात सुरू आहेत आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेत. अशा या गद्दाराला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गाडून टाकत डिपॉझिट जप्त करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

कुटुंब संवाद यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या श्री.उद्धव ठाकरे यांनी आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालयासमोर उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत श्री.ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, शिवसेनानेते तथा आमदार भास्करशेठ जाधव, आ. राजन साळवी, आ.वैभव नाईक, माजी आमदार संजय कदम यांच्यासह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महिला जिल्हाप्रमुख सौ.वेदा फडके, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, माजी उपनगराध्यक्ष संजय साळवी यांच्यासहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना श्री.ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शिवसैनिक हा माझ्या घरातील सदस्य आहे. मी त्यांचा प्रमुख आहे. तुम्ही माझ्या पाठीशी कायम आहात याची मला खात्री आहे. परंतु तुमच्याशी साधायला मी आलो आहे. सत्तेच्या मस्तीमुळे माझ्या शिवसैनिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार राजन साळवी, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना याच पद्धतीने त्रास दिला जातोय. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही. त्याची किंमत या अधिकाऱ्यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरून खुर्चीची किंमत करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. ज्यावेळी संपूर्ण भाजप मोदींच्या विरोधात होते. गुजरातमधील घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना बाजुला करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शिवसेनाप्रमुखांनी ज्या खुर्चीत बसून मोदींची खुर्ची वाचवली. आज तेच मोदी सरकार बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करीत आहेत. मात्र सत्ता आल्यानंतर याची परतफेड नक्की करू असा इशारा श्री.ठाकरे यांनी दिला.
सत्तेची मस्ती आली की गुंडगिरी कशी वाढते याचे उदाहरण आपण नुकतेच पाहिले आहे. परंतु भाजपच्या आमदाराला पोलीस स्थानकात का गोळीबार करावा लागला? आमदारांच्या मुलाला पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये धक्काबुक्की होते. मिंधेची माणसं त्यांना मारहाण करताहेत तरीही पोलीस काहीही करीत नव्हते. अखेर वडीलांना गोळ्या झाडाव्या लागल्या. हे रामराज्य आहे किंवा मराराज्य आहे? असा प्रश्न श्री.ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
मिंधेसहीत सगळे गद्दार गुजरातची चाकरी करणारे आहेत. स्थानिक गद्दार, उद्योगमंत्र्यांचे स्वतःचे उद्योग जोरात सुरू आहेत. परंतु महाराष्ट्र सगळे उद्योग गुजरातला जात आहेत. वर्षानुवर्षे रत्नागिरीत सुरू असलेले उद्योग बंद पडत आहेत. कंपन्या गुजरातला निघाल्या. क्रिकेट सामने गुजरातला निघाले. हे गद्दारसुद्धा सुरूवातीला गुजरातला गेले होते. आता त्यांना त्यांचीच चाकरी करावी लागेल असा टोला श्री.ठाकरे यांनी लगावला.
तुम्ही पक्षाचे चिन्ह घेतले असाल, नाव घेतले असाल. परंतु माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, तेच शिवसेना राहील. माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव दिले आहे. हे नाव काढून घेण्याचा अधिकारी निवडणूक आयोगाला नाही. आम्ही सांगू ते नाव त्यांना द्यावेच लागेल अन्यथा आम्ही त्यांना धोंड्या म्हणून अशी टीका निवडणूक आयोगावर केली.
श्री.ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेनानेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात भाजपसहीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टिकेची झोड उठवली. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरात लवकर जाहीर करा अशी विनंती त्यांनी श्री.ठाकरे यांना केली. यावेळी मेळाव्याला शिवसैनिकांची उत्स्फुर्त गर्दी झाली होती.

राजन साळवींच्या पाठिशीच राहणार
मी आज राजन साळवी यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहे. माझ्यासाठी कोणते पदार्थ केले याची लिस्ट मिडियाने प्रसिद्ध केली आहे. जेवणापूर्वीच मला पदार्थ काय आहेत हे समजले आहेत. परंतु पुन्हा एसीबीवाले येतील. उद्धव ठाकरेंच्या जेवणाचा खर्च विचारतील. मेनुची किंमत विचारतील, पण राजन साळवी तुम्ही घाबरू नका. मी अखेरपर्यंत तुमच्या पाठिशी असेन असा विश्वास श्री.उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.