किरण सामंत यांच्या कार्यालयाच्या बॅनरवरून उदय सामंत यांचे फोटो हटवले; कार्यकर्ते संभ्रमात

रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असतानाच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील ना.सामंत यांचे फोटो हटवले. या घटनेनंतर रत्नागिरीत एकच राजकीय खळबळ उडाली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असताना ही घटना घडल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत.

किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपल्या बॅनर वर केवळ बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवले आहेत. तर शिवसेना जिल्हासंपर्क कार्यालयावरील बॅनर पूर्णतः हटवला आहे. या घटनेने शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रयत्न केला असता प्रतिक्रियेसाठी कुणीही उपलब्ध होऊ शकले नाहीत.