निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
खंडाळा:- सिंधुरत्न समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण रवींद्र तथा भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुशेठ मित्रमंडळ खंडाळा, शिवसेना वाटद जिल्हा परिषद गट आणि शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धा – २०२४ चे बक्षीस वितरण खंडाळा हायस्कूल येथे नुकतेच संपन्न झाले.
शिवसेना वाटद जिल्हा परिषद गट यांच्या वतीने आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती रत्नागिरीच्या मदतीने किरण रवींद्र सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुशेठ मित्रमंडळ खंडाळाचे संस्थापक, अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद मारुती तथा बाबुशेठ पाटील आणि शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र तथा बाबयशेठ कल्याणकार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वाटद जिल्हा परिषद गटस्तर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा गट क्रमांक एक इयत्ता पहिली ते पाचवी, गट क्रमांक दोन – इयत्ता सहावी ते आठवी, गट क्रमांक तीन – इयत्ता नववी ते दहावी आणि गट क्रमांक चार – इयत्ता अकरावी ते बारावी या गटात विविध विषयांवर शाळास्तरांवर घेण्यात आली. त्यातील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाना यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अत्यंत अल्प कालावधीत शिक्षण विभागाच्या मदतीने नियोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला.
गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख सौ. स्मिता मांजरेकर, श्री. राणे, अरुण जाधव अरविंद महाकाळ, एकनाथ महाकाळ यांच्या पुढाकाराने वाटद जिल्हा परिषद गटांतील वाटद, संदखोल, जांभारी, कळझोंडी या केंद्रातील शाळा सहभागी झाल्या होत्या. तब्बल २०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेत त्यातील प्रत्येक तीन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शांतता समिती सदस्य भाई जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर क्रीडा शिक्षक राजेश जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण सभापती तथा तालुका संघटक शरद चव्हाण, पंचायत समितीच्या माजी सभापती मेघना पाष्टे, उद्योजक प्रमोद घाटगे, उद्योजक विनोद चौघुले यांच्यासह जिल्हा परिषद गटांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव विश्वनाथ अंकलगे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुशेठ पाटील, योगेंद्र कल्याणकार, राजेश जाधव, पार्थ पाटील, प्रमोद घाटगे, भाई जाधव, अरुण मोर्ये, सुभाष तांबे, गोविंद डुमनर यांनी विशेष प्रयत्न केले.