किती गुरुजींनी शाळेत फोटो लावले; प्रशासनाने मागवली माहिती, गुरुजी टेन्शनमध्ये

रत्नागिरी:- शाळेत तोतया शिक्षक ठेवणे, स्वतः शाळेत न येणे, असे काही प्रकार रोखण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ’आपले गुरुजी’ या अभियानातून प्रत्येक वर्गात गुरुजींचे फोटो लावण्याचा फतवा काढला होता. दरम्यान, आता वर्षभरानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला या आदेशाची आठवण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती शाळेत अशाप्रकारे गुरुजींचे फोटो लावले आहेत, याची माहिती शासनाने जिल्हा परिषदेकडे मागविली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ’आपले गुरुजी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी आपले फोटो शाळेत वर्गाच्या दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे वर्षभराने याचा अहवाल शिक्षण विभागाने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला पुढील काही दिवसांत सादर करावा लागणार आहे.
वास्तविकतः मध्यंतरी शाळेत तोतया शिक्षक ठेवणे, स्वतः शाळेत न येणे, असे काही प्रकार शाळांमध्ये उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक शाळेत शिक्षकाने स्वतःचा फोटो लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र आपल्या शाळेत फोटो लावण्याबाबत शिक्षकांची मानसिकता झाली नव्हती. मात्र, हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शासनाने जरी वर्गात फोटो लावण्याचा फतवा काढला असला तरी या विरोधात बहुसंख्य शिक्षकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे. काही संघटनांनी या गोष्टीला विरोधही केला आहे.