कोरोना काळात संप नको, कामे संपवा: जिल्हाध्यक्ष प्रदिप वाघोदे
रत्नागिरी:- कास्ट्राईब शिक्षक संघटना संविधानिक पद्धतीने कार्य आणि आंदोलने करते तसेच मागासवर्गीय शिक्षकांची ती मातृसंघटना आहे त्यामुळे कोणीही मागासवर्गीय संघटना सदस्य या संपात उतरणार नाही अशी माहिती कास्ट्राईब माध्य. शिक्षक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदिप वाघोदे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री कारोना संकट काळातही उत्तम पद्धतीने राज्य चालवित आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल बंद असतानाही आर्थिक बाबीत सरकार तारेवरची कसरत करीत आहे. त्यामुळे अशा कठीण काळात अडचणीत असलेल्या कोणत्याही सरकार विरोधात संप पुकारण्यापेक्षा कर्मचार्यांनी कामे संपवा असा सल्ला ही त्यांनी दिला. संविधान दिना रोजीच हा संप जाणिवपूर्वक पुकारला गे ल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळेत हजर राहून संविधान दिन साजरा करावा आणि देश व व्यवसाय यावरची निष्ठा दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. काही प्रस्थापित संघटना मूठभर लोकांच्या सांगण्यावरून नको ते राजकारण करताना दिसत आहे. स्वतःचे नाव मोठे करून लोकांना गोळा करून नंतर संप मागे घेणाऱ्यांच्या संस्कृतीत हे बसते कास्ट्राईब चे कार्य रोखठोक असते. म्हणूनच संघटनेचा जनाधार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही संघटनांचा सत्ताधाऱ्यांशी थेट संबंध असणाऱ्या असतानाही संघटनांना रस्त्यावर उतरण्याची गरज का भासली असा सवाल करून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हही त्यांनी निर्माण केले आहे . संघटना वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीली असून यापुढेही आम्ही सर्व प्रश्न संविधानिक पद्धतीने तडीस नेवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थी शिष्यवृत्या, नियोजित परीक्षा, कर्मचार्यांचे सद्यस्थितील प्रश्न समस्या म्हणून उभे ठाकले असतानाही यावेळीतरी संप पुकारणे उचित नसल्याचे श्री वाघोदे यांनी सांगितले.
संघटनेचे राज्याध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांचे आदेश संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना बंधनकारक आहेत. त्यामुळे कोणीही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संविधान दिनारोजीच्या संपात सहभागी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून कोणीही सदस्याने दबाव तंत्राला बळी न पडता शालेय कामकाज करीत रहावे असे आवाहन जिल्हा सचिव विनोद सांगावकर यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष बसवंत थरकार, लांजा तालुकाध्यक्ष भालशंकर, अ. गं. जाधव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.