रत्नागिरी:- तालुक्यातील कासारवेली-मराठी शाळा येथील रस्त्यावर अज्ञात दुचाकी स्वाराने आठवर्षाच्या लहान मुलाला ठोकर दिली. अज्ञात स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवांश शैलेश वरवडकर (वय ८, रा. कासावरवेली, रत्नागिरी) असे स्वाराने ठोकर दिलेल्या जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास रत्नागिरी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावरील कासारवेली मराठी शाळेसमोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेश बाळकृष्ण वरवडकर (वय ४६, रा. कासारवेली, रत्नागिरी) हे रविवारी दुपारी कासारवेली येथील मराठी शाळेसमोरील रस्त्यावर मुलगा देवांश याला पकडून रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी रत्नागिरी ते गणपतीपुळे जाणाऱ्या स्वाराने दुचाकी निष्काळजीपणे चालवून मुलगा देवांश याला ठोकर देवून अपघाताची खबर न देता पलायन केले. या अपघातामध्ये देवांश याला दुखापत झाली. या प्रकरणी शैलेश वरवडकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.