काळबादेवी गावातील रस्त्यांवरील खड्डे, स्ट्रीट लाईटसह वाढलेली झाडी या समस्या मार्गी लावा

ग्रामस्थांची मागणी 

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी गावातील मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यात काळबादेवी प्रभाग क्रमांक एक मधील स्ट्रीट लाईट, पाथरदेव ते पीर दर्गा मार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून रस्ता मोकळा करावा अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

गावातील प्रभाग क्रमांक एक मध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार अर्ज करण्यात आला होता. ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली मात्र कारवाई काहीच करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  तसेच टेंबरेवाडी स्मशानभूमीमध्ये लाईट व्यवस्था नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी खुप अडचणींना सामोरे जावे लागते. ही समस्या तात्काळ दूर करा अशी मागणी करण्यात आली आहे. 

याशिवाय पाथरदेव ते पीर दर्गा मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गावात एखादा व्यक्ती आजारी असल्यास त्याला रुग्णालयात दाखल करताना विलंब होत आहे. गावामध्ये रिक्क्षा व्यवसासिक, टॅम्पो व्यवसायिक तसेच सामान्य नागरीक यांना देखील या खड्यांमुळे खुप त्रास होत आहे. रस्त्यांच्या बाजूने वाढलेली झाडे यामुळे रस्त्यावरुन प्रवास करताना अपघाताची शक्यता अधिक आहे. प्रामुख्याने पाथरदेव ते मराठी शाळा येथे झाडे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांत अर्ध्यावर आलेली आहेत. यामुळे एस.टी बसला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून आणि रस्त्यालगतची झाडी तोडून होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.