काळबादेवीत तरुणांकडून समुद्री कासवाला जीवदान

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील मच्छीमारी नौकेच्या जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला नौकेवरील तरुणांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. हा प्रकार मंगळवारी (ता. 2) घडला. शासनाकडून सागरी जीवांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचे पालन मच्छीमारांकडून सुरु आहे.

काळबादेवी येथील संदेश मयेकर यांची मासेमारी नौका आहे. संदेश मयेकर त्यांचे सहकारी रुपेश आणि गणेश यांच्यासोबत मासेमारीकरिता समुद्रात गेले होते. मासेमारीसाठी डोल पाण्यात सोडल्यानंतर त्या डोलीत मासळीसह एक मोठे समुद्री कासव सापडले. मासळी जाळ्यात सापडल्यानंतर ते बाहेर काढत असताना कासव आढळले. जाळं पाण्यातून बाहेर काढत बोटीवर घेण्यात आले. बोटीवरील तरुणांनी त्या कासवाची जाळ्यातून सुटका केली. हे करताना जाळ्याच्या नुकसानीचीही त्यांनी परवा केली नाही. ते कासव व्यवस्थितरित्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केले. त्या कासवाला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. थंडीचा मोसम सुरु झाला की कोकण किनारपट्टीवर कासवं अंडी घालण्यासाठी दाखल होतात. ती मच्छीमारांच्या जाळ्यात सापडण्याचे प्रकार घडतात. शासनाकडून अशा समुद्री जीवांना संरक्षण द्या असे आवाहन करण्यात येत आहे. हे करताना मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झालेच तर त्याची भरपाई शासनाकडून दिली जाते. काळबादेवी येथील मच्छीमारांनी जीवदान दिलेल्या त्या कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुण मच्छीमारांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.