रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिराचा महाशिवरात्रोत्सव गुरूवार १६ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. हा उत्सव २० फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या उत्सवात सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक संतोष पवार यांचे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक विशेष आकर्षण असणार आहे.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी काळबादेवी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील १६ फेब्रुवारी पासून हा उत्सव सुरू होत आहे.
गुरूवार १६ फेब्रुवारी रोजी रात्रौ १० वा. श्री महालक्ष्मी नमन नाट्यसंघ कै. दादा लोगडे ग्रुप बसणी यांचे बहुरंगी नमन सादर होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९ वा. शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आणि रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा (इ. १ ली ते ७ वी काळबादेवी मर्यादित) जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार, तृतीय क्रमांक २ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. अभिषेक, किर्तन, पालखी प्रदक्षिणा व अखंड पारायण होईल. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. कै. प्रभाकर भोळे स्मृती कलामंच काळबादेवी ‘शांतेचं’ कार्ट चालू आहे’ हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी संतोष पवार लिखित ‘होस माझी पुरवा’ हा व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर होईल. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम ची शोभा वाढवावी असे श्री देव रामेश्वर, देवी कालिका देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीने कळविले आहे.