कार्तिकी एकादशीनिमित्त भरलेल्या यात्रेनंतर जमा झाला सहा टन कचरा

रत्नागिरी:- कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी बाजारपेठेत भरलेल्या यात्रेवेळी तब्बल ६ टन कचरा झाला. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ४० सफाई कामगारांनी साफसफाई सुरू केली. दुपारी १२ वाजता आटोपली. प्लास्टिक, कागद आणि पुठ्ठ्यांच्या खोक्यांचा कचरा उचलण्यासाठी तीन ट्रॅक्टर एक घंटागाडी आणि एक कॉम्पॅक्टर वाहन वापरण्यात आले.

रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून परिचित आहे. या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. यावर्षी विठ्ठल मंदिरापासून काँग्रेस भवन, पर्याची आळी, मारुती आळी, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ, धनजीनाका अशा परिसरात जिल्हा बाहेरून आलेल्यांनी आपली दुकाने थाटली होती. यात्रेसह विविध सेलच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची आणि भक्तांचीही मोठी गर्दी झाली होती.

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आलेल्या जिल्ह्याबाहेरच्या दुकानदारांनी आपल्या वस्तूंची आवरणे असलेली प्लास्टिकची वेस्टन, फुट्ट्यांचे खोके रस्त्यांवरच टाकून दिले होते. सकाळी याठिकाणचे दुकानदार आले होते तेव्हा प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानांसमोरचा जमलेला कचरा एका बाजूला करून ठेवत होते. त्याचबरोबर रस्त्यावर ठिकठिकाणी जमलेला कचरा झाडूने काढून तो ट्रॅक्टर, घंटागाडीत कॉम्पॅक्टर वाहनात भरत होते. ही वाहने जशी भरत होती तशी कचरा डंपिंग ग्राऊंडच्या येथे टाकून परत येत होत्या.

सुमारे ६ टन अतिरिक्त कचरा उचलावा लागला. इतरवेळी दरवेळी २२ टन कचरा जमा होतो, असे रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून सफाई सुरू झाली. तब्बल ४० कामगारांनी पाच तासांत यात्रेच्या ठिकाणची सफाई पूर्ण केली.