रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात हा डंपर शिरल्याने मोठी धावपळ उडाली.
मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा हा डंपर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक कारवांचीवाडी स्टॉपजवळ चहा पिण्यासाठी टपरीवर गेला होता. त्यावेळी डंपर न्यूट्रलमध्ये असल्याने उताराच्या दिशेने गाडी सरकू लागली.
नियंत्रणाबाहेर गेलेल्या डंपरने प्रथम एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तो थेट घराच्या आवारात घुसला. या अपघातात रिक्षा, दुचाकी, शेड, विहीर तसेच पाण्याच्या पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.









