कारवांचीवाडी येथील बल्कर- लक्झरी अपघातात बल्कर चालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बल्कर गाडीने लक्झरी बसला पाठीमागून धडक देत अपघात केल्याची घटना बुधवारी रात्री 10.45 वा.सुमारास घडली.या अपघातात बल्कर चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

धिरज रामबरण विश्वकर्मा (42,मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.निवळी,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या बल्कर चालकाचे नाव आहे. बुधवारी रात्री लक्झरी बस चालक रेवाशंकर अचलदास वैष्णव (60,मुळ रा.राजस्थान,सध्या रा.खेडशी ,रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील लक्झरी बस (आरजे-46-सीए-2355) घेउन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता.त्याच सुमारास धिरज विश्वकर्मा आपल्या ताब्यातील बल्कर गाडी (एमएच-08-एपी-2340) घेउन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. ही दोन्ही वाहने कारवांचीवाडी येथे आली असता धिरजचा आपल्या वाहनावरील ताबा सूटला आणि त्याने पुढील लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक  इतकी जोरदार होती कि त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तर बल्कर गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर  होउन धिरज विश्वकर्मा गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडला होता.

दरम्यान, या अपघाताची माहिती ग्रामीण पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन गंभीर जखमी अवस्थेतील धिरजला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस करत आहेत.