कारवांचीवाडी फाटा अपघात प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकी अपघातातील त्या संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन जयसिंग मयेकर (रा. वांद्री, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे संशयित १०८ रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. मयुरी किरण नवाळे (वय २९, रा. नानाई परळी, ता. शाहुवाडी, कोल्हापूर) यांचे पती किरण नवाळे व मुले श्रद्धा व श्रेयस असे दुचाकी (क्र. एमएच-०९जीवाय १५६२) वरुन कारवांचीवाडी फाटा ते रत्नागिरी येथे येत असताना दुचाकीच्या मागून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिका (क्र. एमएच-०८ एटी ३८९४) वरिल चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचे पती-किरण व दोन मुले जखमी झाली. या प्रकरणी सौ. मयुरी नवाळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाणे अमंलदार करत आहेत.