कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या

चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीत

रत्नागिरी:- ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी कारवांचीवाडी पारस नगर येथे घडली आहे. मातेने आपल्या केवळ एक वर्षाच्या निष्पाप बाळाला क्रूरपणे ठार केले. हुरेन असिफ नाईक (वय १ वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत बाळाचे नाव आहे.

शाहीन आसिफ नाईक (३५, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे. शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारस नगर येथे वास्तव्यास होती. आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे समजते. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय आहे आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा कसे, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून या घटनेने रत्नागिरी शहर हादरले आहे.