रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील अनेक विकास कामे घेण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ होते. बहूतांश वेळी ठेकेदार कमी दराने कामे घेतात. त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो तर काहीवेळा कामेच होत नाहीत. भविष्यात या पध्दतीने कामे ठेकेदारांना देताना काळजी घ्यावी अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या.
स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सदस्य संतोष थेराडे यांनी विकास कामांच्या निविदा कमी दराने घेतल्यामुळे कामांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या कामांमध्ये रस्ते, पाखाड्यांसह नळपाणी योजनांच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. ठेकेदार कामे घेतात, पण त्यांना ती वेळेत पूर्ण करता येत नाही. काही वेळा ठेकेदार कामच अर्धवट सोडून निघून जातात. परिणामी निधी खर्ची पडत नाही. या गोष्टी टाळण्यासाठी कडक पावले उचलली पाहीजेत असे थेराडे यांनी सांगितले. याची दखल घेत बांधकाम विभागासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना अध्यक्ष बने यांनी दिल्या आहेत.
खादीग्रामोद्योगमधून विविध योजनांतून सुशिक्षीत बेरोजगारांना कर्ज दिले जाते. आतापर्यंत किती लोकांना कर्ज वाटप केली याची माहिती सदस्यांनी मागितली. त्यांना ती देता आलेली नाही. तसेच नामंजूर झालेल्या प्रस्तावांची सविस्तर कारणेही सदस्यांनी मागितली होती. एजंटांकडून आलेले प्रस्ताव तेवढेच मंजूर होतात का असा प्रश्न थेराडे यांनी सभेत केला. यावर संबंधित अधिकार्यांकडून तुम्ही प्रस्ताव आणून द्या, आम्ही ते मंजूर करतो असे आश्वासन देण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आर्सेनिक अल्बम गोळ्या तयार करुन जिल्ह्यात केेलेल्या वाटपासंदर्भात मागील स्थायी समितीत विक्रांत जाधव यांनी विषय मांडला होता. या गोळ्या तयार करण्याचे अधिकार संबंधितांना होते का यावर या स्थायी समितीत उत्तर मिळेल अशी अपेक्ष होती; परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्यामुळे याबाबतचे उत्तर पुढील सभेवेळी दिले जाईल असे आश्वासन अध्यक्षांनी विक्रांत यांना दिले.