आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता राजेश कदम (वय ३५, रा. कान्हे कदमवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:४५ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. श्वेता यांनी आपल्या राहत्या घरातील माजघरात लोखंडी आय-बीमला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्या मयत स्थितीत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. २९ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस.१९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आ.मृ. क्रमांक ०७/२०२६) म्हणून नोंद केली असून, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्वेता कदम यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









