जिल्हाधिकारी यांच्या सूचना
रत्नागिरी:- रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची दिशा ठरविण्याबाबत लवकरच एकत्रित बैठकीचे नियोजन करण्याबाबत सूतोवाच केले. तालुक्यातील कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात तातडीने घेण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यामुळे जागतिक वारसास्थळांकडे वाटचाल करणाऱ्या कातळशिल्प आणि शोधकर्त्यांना बळ मिळाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील व सौ. पाटील यांनी तालुक्यातील चवे, देउड व उक्षी गावातील अश्मयुगीन कातळशिल्प ठिकाणांना भेट दिली. त्यावेळी निसर्गयात्री संस्थेमार्फत चवे, देउड इथे चालू असलेल्या कातळशिल्प संरक्षण संवर्धन प्रकल्पाबाबत शोधकर्ते संशोधकांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्प पूर्ततेसाठी सर्व सहकार्य लाभेल, असे आश्वासन संस्था सदस्यांना दिले.
या वेळी चवे गावचे सरपंच दीपक गावणकर, देउड गावचे सरपंच संजय देसाई, पोलिसपाटील संदेश घाणेकर आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधताना लोकसहभागातून परिसर विकास यावर भर देण्याबाबत डॉ. पाटील यांनी मार्गरदर्शन केले.
या वेळी कातळशिल्प संरक्षण संवर्धनासाठी ज्यांनी पहिले पाऊल उचलले ते माजी सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्यासह सरपंच सौ. किरण जाधव, उपसरपंच मंगेश नागवेकर, पोलिस पाटील अनिल जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कातळशिल्प एकत्रित विकासाबाबत संकल्पना मांडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शोधकर्त्यांना दिल्या. तालुक्यातील कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात तातडीने घेण्याच्या सूचना उपस्थित तहसीलदार शशिकांत जाधव यांना दिल्या. भेटीवेळी शोधकर्ते संशोधक सुधीर रिसबुड, पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे, वास्तुविशारद मकरंद केसरकर, सुहास ठाकरदेसाई उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याने भूषवावा, अशा वारसा संवर्धनासाठी श्री. पाटील यांची प्रत्यक्ष ठिकाणांना भेट निश्चितच आश्वासक असल्याचे मत रिसबुड यांनी व्यक्त केले.