काजू बी तारण योजनेतून शेतकऱ्यांना मोठा नफा 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 14 शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत 90 टन काजू बी तारण म्हणून ठेवली होती. त्यापोटी 50 लाख 53 हजार रुपये कर्ज स्वरुपात शेतकर्‍यांना देण्यात आले. आतापर्यंत 78 टन काजू बीची विक्री झाली असून, शेतकर्‍यांना 100 ते 125 रुपये किलोमागे दर मिळाला आहे. यातून किलोमागे शेतकर्‍यांना 30 ते 55 रुपयांचा नफा मिळाला.

शेतमाल तारण योजनेत चार वर्षांपूर्वी काजू बीचा समावेश केला होता. ऐन हंगामात मोठ्याप्रमाणात काजू बी उपलब्ध होत असल्यामुळे दरावर परिणाम होतो. यंदा एप्रिल, मे मध्ये काजूला 75 रुपये किलो दर होता. गतवर्षी हाच दर 100 रुपयांपेक्षा अधिक होता. यंदाच्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने 100 टन काजू तारणचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, अचानक उद्भवलेले कोरोना संकट, यानंतर झालेले लॉकडाऊन यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक ओढाताण झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्याकडील काजू बी तत्काळ विक्रीसाठी काढली. परिणामी बाजार समितीला उद्दिष्ट्यपूर्ती करता आली नाही. तरीही 90 टन काजू बी साठवण्यात आली. यामध्ये गुहागर तालुक्यात 43.24 टन, राजापूर तालुक्यात 7 टन, लांजा तालुक्यात 10 टन, संगमेश्‍वर तालुक्यात 30 टन काजू बी शेतकर्‍यांनी तारण ठेवली. या शेतकर्‍यांना बाजार समितीमाफत किलोमागे 56 रुपये देऊन आर्थिक सहाय्य करण्यात आले. एकूण 50 लाख 53 हजार 440 रुपये देण्यात आले. शेतकर्‍यांकडून भाड्यापोटी केवळ 6 टक्केच रक्कम आकारण्यात येत आहे. दर वधारल्यानंतर ही काजू बी हळूहळू विक्रीला काढली जात आहे. कोरोना कालावधीत दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. किलोमागे 70 ते 75 रुपये दर होता. सध्या किलोमागे 110 ते 125 रुपयांचा दर मिळत आहे. आतापर्यंत 78.24 टन काजू बीची विक्री झाली आहे. यातून शेतकर्‍यांना 30 ते 55 रुपयांचा नफा मिळत आहे.