काजळी नदी घेणार मोकळा श्वास; नामसह ग्रामस्थांचा सहभाग 

रत्नागिरीः– गेले अनेक वर्ष गाळात रुतलेल्या काजळी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यासाठी नाम फाऊंडेशनसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून गाळ उपसल्यामुळे नदीची साठवण क्षमता ७५ हजार घनमीटरने वाढणार आहे. त्यामुळे नदी नजिकच्या साखरपा, कोंडगाव, पुर्ये, भडकंबा या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तर यानंतर देवळे, देवडे, मुर्शी, सांगव या गावांमधील नदीचा गाळ उपसण्यात येणार असून या उपक्रमामुळे नदी मोकळा श्वास घेणार आहे.

जिल्ह्यातील नद्यांच्या गाळाचा गेली अनेक वर्षे उपसा न केल्याने नदी पात्र उथळ बनत चालले आहे. तसेच साचलेल्या गाळामुळे नद्या आपला मूळ प्रवाह बदलतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पुराचे पाणी आजूबाजुच्या भागात घुसते. सतत येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे या भागातील जमीनी नापीक होऊ लागतात. यासाठी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने ग्रामस्थ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेत आहेत.

काजळी नदीच्या गाळ उपसण्याच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. या कामाला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात एक कि.मी.लांब आणि ६० मी रुंद गाळ काढण्यात येणार आहे.  आतापर्यंत ६०० मी.पुर्ण झाले असून ४०० मी.काम शिल्लक आहे. ३ मीटर खोल गेल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पुर येणार नाही.तर काजळी नदीवर तीन बंधारे बांधण्यात येणार असून यातिल एका बंधाऱ्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  

विशालगडमधून येणारी गडनदी खाली देवड्यापासून साखरपा येथे काजळी नदी होते. तर मुर्शीतून येणारी केव नदी साखरपा येथे संगम होऊन काजळी नदी होते. काजळी नदीचा गाळ उपसा झाल्यानंतर देवडे, देवळे, सांगव, मुर्शी या गावांमधील नद्यांचाहि गाळ उपसा केला जाणार आहे.

काजळी नदीचा गाळ उपसण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसह कर्मचाऱ्यांसाठी ३० हजार प्रतिदिन खर्च येतो. पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३० लाख निधीची आवश्यकता असून स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनामार्फत निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

काजळी नदीचा गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने मान्यता दिली असून या विभागाच्या सहकार्याने श्री दत्त देवस्थान कोंडगाव, नाम फाऊंडेशन, ग्रुप ग्रमपंचायत कोंडगाव साखरपा, श्री दत्तसेवा पतसंस्था, कोंडगाव, व्यापारी मंडळ कोंडगाव साखरपा या संस्थांनी सहभाग घेतला आहे.