रत्नागिरी:- पावसाने गुरुवारी रत्नागिरी तालुक्याला झोपडून काढले. तालुक्यातून वाहणार्या काजळी व बावनदी या दोन्ही नद्या इशारा पातळीवर वाहत होत्या. काजळी नदीचे पाणी चांदेराई पुलावरुन वाहत होते तर बाजारपेठेतही पाणी घुसले होते. सोमेश्वर, तोणदे, टेंबेपूल, पोमेंडी, गुरुमळी या गावांना पुराचा फटका बसला. अनेक गावाती किनार्यालगतीची शेती पाण्याखाली गेली होती. तर कोळंबे येथे नदीत प्रौढ वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
गेले दोन दिवस रेड अलर्ट असून रत्नागिरी तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चौवीस तासात जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 177 मी.मी. पाऊस एका दिवसात नोंदवला गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच नद्यानाले दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यामधून वाहणारी प्रमुख काजळी नदी इशारा पातळीच्यावरती वाहत आहे. नदीचे पाणी चांदेराई पुलावरुन वाहत असल्याने येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चांदेराई बाजारपेठेतही तीन-चार फुट पाणी आले होते. परंतु वाढणारे पाणी पाहून बुधवारी सायंकाळनंतर अनेक व्यावसायिकांनी आपले सामान अन्यत्र हलवले होते. गुरुवारी दिवसभर चांदेराई पूल व बाजारपेठेत पाणी होते. सायंकाळी 7 वाजता भरती असल्याने सायंकाळपर्यंत पुराचे पाणी कायम राहिल अशी शक्यता माजी सरपंच दादा दळी यांनी व्यक्त केले.
काजळी नदीला आलेल्या पुरामुळे तोणदे, हातिस, सोमेश्वर, पोमेंडी, काजरघाटी, गुरुमली, टेंबेपूल येथील नदी किनार्या लगतच्या शेतीमध्ये मोठ्याप्रमाणात पुराचे पाणी घुसले होते. सोमेश्वर येथे रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे हे सकाळपासूनच पूर परिस्थिती असणार्या भागात फिरुन पाहणी करीत होती. तलाठी व नायब तहसीलदारांची नेमणूक त्यांनी या भागात लक्ष ठेवण्यासाठी केली होती. पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारे साहित्यही या भागांजवळ सुरक्षित ठेवण्यात आले होते. तालुक्याच्या पूर्वभागातून निवळी गावाजवळून वाहणारी बावनदीही इशारा पातळीच्या वरती वाहत होती.
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे बुधवारी रात्री रविंद्र कृष्णा भाटकर हे नदीच्या पाण्यात वाहून गेले. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, वाटद येथे वाहून गेलेल्या कामगारांपैकी एकाचा मृतदेह अद्याप आढळलेला नाही.









