काजळी नदीला पूर; चांदेराई बाजारपेठेत पाणी

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला असून चांदेराई, तोणदे, पोमेंडीला तडाखा बसला आहे. पुराचे पाणी चांदेराई बाजारेपेठेत शिरले असून हरचिरीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठेत पाच फुट पाणी आल्यामुळे शेकडो दुकानांसह तिन घरांना पाण्याचा वेढा होता. सकाळी नऊ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत सुमारे आठ तासाहून अधिक काळ पुराचे पाणी होते.

गेले चार दिवस रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले होते. सोमवारी (ता. 8) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही पाऊस पडत असल्यामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. आज सकाळी नऊ वाजल्यानंतर पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरु लागले. रत्नागिरी काजरघाटी मार्गे लांजा जाणारा मार्ग वाहतूकीसाठी थांबवून ठेवण्यात आला होता. पुढे तासाभरातच पाण्याचा वेग वाढला. चांदेराई पुलावरुन पाणी जाऊ लागले. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. चांदेराई बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळपासून साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरवात केली होत. त्यामुळे मोठे नुकसान झाले नसले तरीही काही साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुर वाढू लागल्यानंतर ग्रामस्थांनीही सुरक्षित ठिकाणी जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली. किनार्‍यावरील तिन घरांना पाण्याचा वेढा पडलेला होता. सुदैवाने विदयुत पुरवठा सुरळीत राहिल्यामुळे दिलासा मिळाला होता. दुपारी भरती ओसरल्यानंतर पुराचे पाणी एक इंचाने कमी झाले, मात्र पुन्हा सायंकाळी भरतीच्या कालावधीत पाणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सतर्कतेच्या सुचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत. काजळी नदीच्या किनारी भागाती गावांना पुराचा तडाखा बसला आहे. तोणदे, पोमेंडी येथील रस्त्यापर्यंत पाणी आल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. पोमेंडीतील शेकडो एकर भातशेती सलग दुसर्‍या दिवशी पाण्याखालीच होती.