Wednesday, August 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी कस्तुरी चायनीज सेंटरमधील वादातून रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न?

कस्तुरी चायनीज सेंटरमधील वादातून रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न?

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी

रत्नागिरी:- शहरातील कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अँटी करप्शन कमिटीचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट तथा रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते समीर काझी यांनी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून सखोल चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

समीर काझी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून वाद झाला. या वेळी काही व्यक्तींनी शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे तसेच रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत काझी यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. तक्रारीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधितांकडून रिव्हॉल्वर ताब्यात घेण्यात आली. मात्र, पुढील कारवाईबाबत काझी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तक्रारीत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रकरण हाताळताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेली रिव्हॉल्वर तपासल्यानंतर ती खेळण्यातील रिव्हॉल्वर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या रिव्हॉल्वरबाबत स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून सत्यता पडताळण्यात यावी, अशी मागणी समीर काझी यांनी केली आहे. तसेच घटनेतील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तक्रारदाराच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काझी यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शहर पोलीस निरीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पोलीस चौकशी झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.